विदर्भ, १७ सप्टेंबर २०२० : जालना, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, लातूर जालना जिल्ह्यात बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका आणि दुधना नदीला मोठा पूर आला होता. या पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी पिकात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी ऊस आणि मका पीक आडवे झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील नरसी, कहाकर परिसरात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात चार पाच दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे जून्ना आणि शिरूर दबडे इथले तलाव पाण्याने तुडूंब भरले आहेत. मुखेडजवळील मोती नदीलाही पूर आला आहे. या पुराचे पाणी फुलेनगर आणि वाल्मिकीनगर इथल्या घरांमध्ये शिरलं असून तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. बन्नाळ शिवारातील पाझर तलाव काल सकाळी फुटला. बुलडाणा जिल्ह्यातही काल दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
दरम्यान लातूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सतत होत असलेल्या पावसामुळे देवणी तालुक्यातील शेतीचं रस्त्याचं आणि पुलाचं मोठं नुकसान झालं असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसापासून चांगलाच पाऊस पडत असल्याने बिदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण ९८ % भरले आहे. या प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १० हजार क्यूसेक्स ने माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा.अ.सळगरकर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी