राज्यात ठिक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी गारपीट, शेतीचे नुकसान

पुणे, २२ मार्च २०२१: मागील आठवड्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. यानुसार गेल्या दोन दिवसात राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त झाला असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे आणखीन नुकसान होणार आहे.

कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी ते गोव्यामार्गे आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मावळमध्ये पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका पावसासाठी ओळखला जातो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसात मावळ तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील बघण्यास मिळाली. विशेष करून मावळ पावसाळ्यात पर्यटनासाठी ओळखला जातो. काल झालेल्या या पावसामुळे त्यात रविवारचा दिवस पर्यटकांना दिलासा मिळाला.

अमरावतीत मुसळधार

अमरावती जिल्ह्यात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी गारपीट देखील बघण्यास मिळाली. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात चिखलदरा तालुक्याला गारपीटीने अक्षरशः झोपडून काढले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह रात्री पासून पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या गहू पिकाला मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.

कोल्हापूर मध्ये पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गडहिंग्लज, नेसरी भागात तुफान पाऊस पडला. शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. तर अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर पावसाचा परिणाम झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा