गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस, वेतवडे-मांडूकली-अणदूर बंधारे पाण्याखाली

साळवण,गगनबावडा १९ जुलै २०२३: कुंभी धरण पाणलोट क्षेत्रासह गगनबावडा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुंभी नदीवरील वेतवडे, मांडूकली, अणदूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मंगळवारी पासून गेल्या २४ तासांत सरासरी १८१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सलग तिसऱ्या दिवशी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. कुंभी धरणांमध्ये १.६१ टीएमसी इतका पाणीसाठा झालाय. कोदे व वेसरफ तलावातून अनुक्रमे ११४४ व ३४५ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे.

यामुळे कुंभी व सरस्वती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असल्याचे पाटबंधारे विभाग शाखा अधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगितले. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा