मुंबई, २० जुलै २०२३ : सध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाने लोक त्रस्त आहेत. राजधानी मुंबईत मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दुसरीकडे रहिवासी भागात पाणी शिरले आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत शहरात सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी सकाळी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला आणि आज पावसाची शक्यता पाहता हवामान खात्याने शहरासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. IMD मुंबईने आपल्या दैनंदिन हवामान अंदाजात आज म्हणजेच गुरुवारी “शहर आणि उपनगरात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. स्थानिक नागरी संस्थेच्या म्हणण्यानुसार, आज दुपारी १:२३ वाजता समुद्रात ४.२३ मीटर उंचीची भरतीही अपेक्षित आहे.
मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे, सातारा आणि रत्नागिरी ही शहरे अलर्टवर आहेत. आज रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, किमान १०० लोक अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (NDRF) भूस्खलनाच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील इर्शलवाडी गावात बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यासोबतच भूस्खलनात जखमी झालेल्या २० हून अधिक लोकांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड