नागपूर, २७ जुलै २०२३ : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.त्याचबरोबर राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावासामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. दरम्यान, हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
नागपूरमध्ये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत १६४ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. मात्र, दुसरीकडे अंबाझरी तलाव ओहरफ्लो झाल्याने तो बघायला पर्यटकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्यटकांना पाण्यापासून दूर राहिण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदरी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसामुळे हिंगणा भागात वेणा नदीला पूर आल्याने काही नागरिक अडकले आहेत.विटभट्टी, मिहान रोड येथे ८ पुरुष, ५ महिला, ३ मुले पुरामध्ये अडकले आहेत. या ठिकाणी बचाव कार्यासाठी बोटीची आवश्यकता आहे. सध्या रेस्क्यु ऑपरेशन सुरु झाले आहे.
वेणा नदीला आलेल्या पुरात १६ नागरिक अडकले होते. एनडीआरएफच्या टीमने या १६ लोकांना सुखरुप बाहेर काढले आहे. वेणा नदी आणि नाल्याच्या मधल्या भागात वीटभट्टीवर काही मुजारांच्या कुटुंबांचे वास्तव्य होते. रात्री अचानक आलेल्या पावसाने या नागरिकांना बाहेर निघणे अवघड झाले होते. शेवटी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून एनडीआरएफच्या टीमला बोलावण्यात आले. त्यानंतर या सर्व नागरिकांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
नागपूरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाखाली दोन ट्रक पाण्यात अडकले आहेत. तसेच नागपूर विमातळाच्या प्रवेशदारावर विदारक चित्र दिसून येत आहे. विमानतळावर प्रवेश करणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. आजचा दिवस पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूर वेध शाळेने हा अलर्ट दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर