पुणे, १८ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, IMD ने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार १९ जुलैच्या रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. अशा परिस्थितीत प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग आणि आवश्यक औषधे ठेवण्यात आली आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद म्हणाले, आयएमडीने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषत: १९ जुलैच्या रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानुसार, पुणे जिल्हा आपत्ती निवारण आराखड्यानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांना जोखमींचे मूल्यांकन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मंगळवारसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड