पालघर, १९ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आणि २५० हून अधिक कुटुंबांना ठाण्यातील सखल भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक भागात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.
ठाण्यातील उल्हास नदी आणि रायगडमधील अंबा, सावित्री आणि पाताळगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांनी सांगितले की, ठाणे बदलापूर शहरातील सोनिवली आणि हेंद्रपाडा येथील सुमारे २०० कुटुंबांना अतिवृष्टी आणि पुरामुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
कल्याण तालुक्यातील मौर्य नगर येथील सुमारे ६० कुटुंबे आणि ठाण्यातील अंबरनाथ भागातील वृद्धाश्रमात राहणाऱ्या काही वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी बुधवारी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड