पुणे, ८ नोव्हेंबर २०२३ : एक-दोन दिवसांत तापमानात घट झाली असून महाराष्ट्रात कमालीची थंडी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे. आज बुधवारी सकाळपासून कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आज पहाटेपासून कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या खरीप हंगामातील पिके काढणीला आली असताना अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याने केले आहे. अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ही परिस्थिती पश्चिम- वायव्य दिशेने आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड