राज्यात पुढील चार दिवस पावसाचे,कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

6

पुणे, १४ जुलै २०२३ : उत्तर भारतात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राज्यातील पुढील चार-पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरात पावसाचे वातावरण तयार झाले असली तरी सर्वत्र पाऊस झालेला नाही. पुणे शहरातील उपनगरामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे.

जुलैचा दुसरा आठवडा लोटला तरीही राज्यातील धरणात अवघा ३०% जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणात सरासरी तब्बल १६ % पाणीसाठा कमी आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे केवळ ३०% च भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्याची चिंता वाढवली आहे.

पुणे विभागातील धरणांत सर्वात कमी २०% जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये २४ % तर अमरावती विभागात ४०% जलसाठा आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ४६% जलसाठा आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये २९% जलसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ५२% पाणीसाठा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा