सातारा लोणंद मार्गावरील जड वाहतुक बंद करावी- भाजपा जिल्हा सचिव मदन साबळे

सातारा २६ फेब्रुवारी २०२४ : अलिकडच्या काळात सातारा लोणंद मार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका वाढल्याचे पाहायला मिळाले असून या मार्गावरील रोजची वाहतुक, आणि मोठ्या जड वाहनांची वाहतुक यामुळे या मार्गावरील गावांतील नागरीकांना आणि या मार्गावरुन वाहतुक करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यामुळे या मार्गावरील जड वाहतुक बंद करावी अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिला आहे.

सातारा ते लोणंद रस्त्यावरील वाढेफाटा ते लोणंद हद्दीत खूप अपघाताचे प्रमाण सध्या वाढलेले आहे त्याला मूळ कारण यामार्गावरील असणारी जड वाहतूक आहे. जड वाहने टोल वाचवण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात पण मुळातच हा मार्ग अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर लोणंद मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन सातारकडे करावी तसेच याविषयाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी लक्ष घालावे अशी मागणी जनसामान्यांच्या मधून जोर धरत आहे.

या मार्गावरती लोणंद आणि पुणे, नगर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील मोठी जड वाहने फक्त टोल चुकविण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. याअगोदर सुध्दा या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी जनआंदोलने करण्यात आली आहेत. मागील काळात ज्यावेळी वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलाची आणि वाढे मधील वेण्णा नदीवरील पुलाची अवस्था खराब झाली होती.त्यावेळी यामार्गावरील जड वाहतुक बंद करुन दुसऱ्या मार्गे वळविण्यात आली होती. या मार्गावरती मोठ्या जड वाहनधारकांना निष्पाप लोकांचे जीव घेण्याची मुभा प्रशासन देत आहे का ? देऊर, वडूथ, आरळे, वाढेफाटा अंबवडे चौक, वाठार, लोणंद या ठिकाणचे अपघात प्रशासन विसरलं का ? यावरती प्रशासनाने योग्य ती पाऊले लवकरात लवकर उचलावीत आणि या मार्गावरील जड वाहतूक त्वरीत बंद करण्यात यावी आणि सामान्य जनतेला, दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना न्याय मिळावा.

या मार्गावरील वाढे येथील वेण्णा नदीवरील व वडूथ येथील कृष्णा नदीवरील अरुंद पुल आहेत. या दोन्ही पुलांची डागडुजी वेळेवर केली तर वाहनधारकांना सुखकर प्रवास करता येईल. पावसाळ्यात वाढे येथील पुलावरती पाणी साचते आणि यामुळे खड्डे पडतात त्याच खड्ड्यांमुळे पुन्हा अपघातांची मालिका सुरु होते. हे दोन्ही पूल सुमारे १७५ वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दगडी पूल आहेत.त्याचे योग्य संवर्धन या विभागांमार्फत व्हावे.अशी मागणी सुध्दा जनतेतून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा