मुंबई, ८ जून २०२०: निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासीयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत १४ ट्रक मदतसामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आली.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, राहुल नार्वेकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदी सामुग्रीचा समावेश आहे. मुंबई भाजपाच्या वतीने गेली दोन दिवस एक अभियान राबविण्यात आले असून त्या अभियानातून जनसहभागातून ही मदतसामुग्री गोळा करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली, ती १४ ट्रक सामुग्री आज रवाना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि कोकण विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती आणि त्यात मदतसामुग्री तातडीने रवाना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार, ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
कोेकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहील. तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल, ही त्यांना देण्यासाठी पक्ष कायम काम करेल. आज पहिल्या टप्प्यात १४ ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवार्याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी