पुणे, 1 फेब्रुवारी 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अशा प्रकारे त्या आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस असेल. अर्थसंकल्प हा दरवर्षी मोठा कार्यक्रम मानला जातो. बजेटशी संबंधित 10 मोठ्या आणि ऐतिहासिक गोष्टी जाणून घेऊया:
- भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स विल्सन यांनी 1860 मध्ये सादर केला होता. विल्सन यांनी 1853 मध्ये Chartered Bank of India, Australia and Chinaची स्थापना केली, जी 1969 मध्ये Standard Chartered Bank बनली. त्यांनीच ‘The Economist’ नावाचं प्रतिष्ठित प्रकाशन सुरू केलं.
- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
- 1955 पर्यंत, अर्थसंकल्प फक्त इंग्रजीत सादर केला जात होता, परंतु 1955-56 पासून, अर्थसंकल्प दस्तऐवज इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रकाशित केला जात होता.
- माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पी चिदंबरम यांनी आठ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. माजी अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख आणि प्रणव मुखर्जी यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला.
- 1998 पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी सादर होत असे. ब्रिटिशकालीन ही प्रथा संपवत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सकाळी 1998-1999 चा अर्थसंकल्प सादर केला.
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1970-71 मध्ये काही काळ अर्थ मंत्रालयाचा कारभारही सांभाळला होता आणि अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
- 2016 पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होत असे. तथापि, ही परंपरा 2017 पासून बदलली जेव्हा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
- यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्यात आला. यामुळं 92 वर्षांची परंपरा संपुष्टात आली.
- या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओमिक्रॉन प्रकार पाहता, 70 वर्षांच्या हलवा सोहळ्याच्या परंपरेऐवजी मिठाईचं वाटप केलं. पूर्वी बजेटच्या छपाईची सुरुवात हलवा समारंभानं होत असे.
- 2019 मध्ये, पारंपारिक ब्रीफकेसऐवजी, सीतारामन यांनी लेजरमध्ये बजेट दस्तऐवज आणलं (राष्ट्रीय चिन्हासह लाल रंगाचं पॅकेट).
- देशातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तास 41 मिनिटांचं अर्थसंकल्पीय भाषण दिलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे