हायटेक नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश!

18

पाच राज्यांतील ५० हजार तरुणांची फसवणूक

भुवनेश्वर, २ जानेवारी २०२३ : पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालविले जाणारे देशातील सर्वांत मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओरिसा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालविणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे‌. बनावट कॉल सेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सीमकार्ड, आर्थिक उलाढालीसाठी सुविधा केंद्रांचा आणि बनावट बँक खात्यांचा वापर अशा पद्धतीने हे रॅकेट चालविले जात होते.

गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांतील ५० हजारांहून अधिक तरुणांना या रॅकेटच्या माध्यमातून गंडा घातला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ओरिसा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील जफर अहमद आहे. त्याला सिव्हील लाईन्स भागातून अटक करण्यात आली आहे‌.

उच्चशिक्षित अभियंत्यांची एक टोळीच हे रॅकेट चालवायची. जफर अहमद हा त्यांचा मोरक्या होता. आठ ते दहा जणांचा हा कोअर ग्रुप वेबसाईट डिझायनिंगच्या कामात तज्ज्ञ होता. ते विविध सरकारी योजनांच्या नावाने वेबसाईट तयार करायचे. या ‘कोअर ग्रुप’च्या हाताखाली ५० जणांचे एक कॉल सेंटर चालविले जायचे. त्यातील कर्मचाऱ्यांना दरमाह १५ हजार रुपये पगार दिला जात होता.

प्रधानमंत्री योजनेच्या खाली आरोग्य कौशल्प विकास आदी विभागांच्या भरतीच्या जाहिराती आपल्या बनावट वेबसाईटवर प्रकशित करीत. एवढेच नव्हे, तर त्यांनी चक्क दैनिकांतही अशा भरतीच्या जाहिराती दिल्या व मोबाईल नंबर्स दिले. त्यावर ते उमेदवारांकडून नोंदणी, मुलाखत प्रशिक्षण व इतर बाबींसाठी ३ ते ५० हजार रुपये शुल्क आकारत. अशा प्रकारे गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांतील ५० हजारांहून अधिक तरुणांना या रॅकेटच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे‌.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा