लडाख, दि. १४ जुलै २०२०: भारत व चीन लष्कराच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे. भारतीय हद्दीतील चुशुल या भागामध्ये ही चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून भारत व चीन यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाद सुरू आहेत. हे वाद मिटवण्यासाठी सातत्याने चर्चासत्र सुरू आहेत. या चर्चासत्रा दरम्यान चीन व भारत यांच्यामध्ये हिंसक चकमक झाली होती व त्यामध्ये २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर हा वाद अधिकच शिगेला पेटला त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही लष्कर करत आहेत.
ही चर्चा पूर्व लडाखमधील चुशुल मध्ये सकाळी साडेअकराच्या दरम्यान होणार असल्याचे सांगितले जात आहे. पँगाँग त्सो आणि डेप्सांग यांच्यासह इतर भागांतून फौजा माघारी घेण्याचा दुसरा टप्पा सुरू करणे, तसेच मागच्या बाजूच्या तळांवरून फौजा आणि शस्त्रास्त्रे कालबद्ध रीतीने मागे घेणे यावर चर्चेचा मुख्य भर राहणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. पँगाँग त्सो येथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी झालेल्या संघर्षांनंतर तणाव उद्भवण्यापूर्वी पूर्व लडाखमधील सर्व भागांमध्ये जी परिस्थिती होती, ती ‘पूर्णपणे जैसे थे’ केली जावी, यावर भारत भर देईल असेही सूत्रांनी सांगितले.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथील १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग, तर चिनी बाजूचे नेतृत्व दक्षिण झिनजियांग लष्करी क्षेत्राचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन हे करण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी