पुणे ५ मार्च २०२६ : पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठाच्या आवारात आज पालकांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने आज कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाल्याचा प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून पीडित तरुणीला ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. आज तो विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आला असता, वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावले, ज्याचे रूपांतर वादात झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकाराबाबत पीडित कुटुंबाने आधीच विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. “विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन कोणत्या घटनेची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी कॅम्पसमध्ये येऊन मुलींची छेड काढतोच कसा असा सवाल उपस्थित झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : दिनेश वढणे













































