‘हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान बनेल’ : असदुद्दीन ओवैसींची इच्छा

बंगळुरू, २६ ऑक्टोबर २०२२: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ‘ एक दिवस हिजाब घातलेली मुलगी भविष्यात भारताची पंतप्रधान व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असे म्हटले आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत ओवेसी यांना विचारल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले.

यावेळी भाजपवर हल्लाबोल करताना ओवैसी म्हणाले,भाजपचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. पंतप्रधान फक्त तोंडानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास बोलतात. मात्र, भाजप हा हलाल मांसाच्या विरोधात आहे, मुस्लिम धर्मातील इतर चालीरीतींच्या विरोधात आहे. तसेच भाजप मुस्लिम अस्मितेच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्नाटकातील विजापूरमध्ये २८ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या चार प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसंदर्भात जनतेला संबोधित करताना ओवैसी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी आम्ही टीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या सांगण्यावरून इथे निवडणूक लढवली नव्हती, त्यावेळी आम्ही जनता दलाचा (एस) प्रचार केला होता. मात्र, यावेळी मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी इथे आलो आहे.

दरम्यान, कर्नाटकातील उडुपी शाळेतून हिजाबबाबत देशात नवा वाद निर्माण झाला होता, इथे विद्यार्थिनींना आतमध्ये हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा