हिमाचल- पंजाबसह ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट, ४ दिवसांत १०० जणांचा मृत्यू

दिल्ली, १२ जुलै २०२३: हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, यूपी, पंजाब आणि हरियाणामध्ये सतत पाऊस पडत आहे. खराब हवामानामुळे तसेच मुसळधार पावसाने, गेल्या ४ दिवसांत देशातील विविध राज्यांमध्ये १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ८ जुलैपासून हिमाचल प्रदेशात ३६, यूपीमध्ये ३४, जम्मू-काश्मीरमध्ये १५, उत्तराखंडमध्ये ९, दिल्लीमध्ये ५ आणि राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणामध्ये १-१ मृत्यू झाला आहे.

आजही हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. शिमला, सिरमौर, किन्नौरमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. बियास नदीच्या प्रवाहामुळे कुल्लूमध्ये ३० घरे आणि ४० दुकाने असलेल्या सैंज मार्केटचा अर्धा भागच वाहून गेला आहे. यासोबतच आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भूस्खलनामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहेत. तीन ते पाच हजार लोक अजूनही येथे अडकून पडले आहेत.

दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीच्या पाण्याची पातळी २०७ मीटरच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे, हरियाणातील हथिनी कुंड बॅरेजमधून ३.४५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने राजधानीत पुराचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढल्याने पुराचा धोका व्यक्त केला जात आहे. केजरीवाल सरकारने स्थानिक लोकांना यमुनेच्या खालच्या भागापासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि येत्या २४ तासांत झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये हलका पाऊस अपेक्षित. राजस्थान, जम्मू- काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस किंवा सरी पडू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा