शिमला, ८ जानेवारी २०२३ :हिमाचल प्रदेशातील मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा अखेर संपली असून, आज रविवारी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यावेळी सात आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी आमदारांना शपथ दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सखू मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या आता नऊ झाली आहे. विक्रमादित्य यांच्याशिवाय कसुम्प्टीचे तीन वेळा आमदार झालेले अनिरुद्ध सिंह, शिलाईचे आमदार हर्षवर्धन चौहान, माजी सभापती जगत सिंह नेगी आणि जुब्बल कोटखईचे आमदार रोहित ठाकूर यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आले आहे. यासोबतच सोलन (राखीव) विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले धनीराम शांडिल यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर चंदर कुमार हे कांगडा जिल्ह्यातील जावळीमधून मंत्रीही झाले आहेत.
- खर्गे यांच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ विस्तार
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर सखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी महिनाभरापूर्वी शपथ घेतल्यापासून नवीन मंत्र्यांच्या नावांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. नावांची यादी हायकमांडकडे सुपूर्द केल्याचे सखू यांनी शनिवारी सांगितले होते. म्हणजेच हिमाचलमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीनंतरच झाला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.