हिंजवडी २८ नोव्हेंबर २०२५ : हिंजवडीतील धक्कादायक प्रकार समोर आला असून, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या घोर निष्काळजीपणामुळे येथील चिमुकल्यांना जीव वाचवण्यासाठी टाहो फोडावा लागला. हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये ही गंभीर घटना घडली.
ग्रामपंचायत सदस्याने बोलावलेल्या मीटिंगसाठी जाण्याच्या घाईत, सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी चक्क वीस लहान मुलांना आतमध्ये कोंडून, बाहेरून सेफ्टी गेटला कुलूप लावले आणि ग्रामपंचायत कार्यालयात निघून गेल्या. शिक्षक उपस्थित नसताना, अचानक दरवाजा बंद झाल्याने घाबरलेल्या मुलांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली.
सुदैवाने, बाहेर उभ्या असलेल्या काही पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. पालक उज्ज्वला जोगदंड यांच्यासह इतरांनी तातडीने सेविकांना फोन लावला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, त्यांनी थेट एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

वरिष्ठांकडून संपर्क झाल्यावर, संबंधित सेविका आणि मदतनीस धावत परत आल्या आणि त्यांनी दरवाजा उघडून मुलांना दिलासा दिला. मात्र, परत आल्यावरही त्यांनी पालकांशी उद्धट वर्तन केल्याची तक्रार आहे.
या गंभीर प्रकाराची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतली असून, त्यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश बालविकास विभागाला दिले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुळशीचे अधिकारी धनराज गिराम यांनी हा प्रकार गंभीर असून, चौकशीनंतर निष्काळजीपणा आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. संतप्त पालकांनी संबंधित सेविका आणि मदतनीसावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे














































