हिंजवडीची ‘आयटी नगरी’ संकटात! दुर्लक्षामुळे उद्योगांचे स्थलांतर; प्रशासन ढिम्म, कर्मचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला!

Hinjewadi IT Park Facing Neglect Pune IT companies shifting infrastructure Crisis
दुर्लक्षामुळे उद्योगांचे स्थलांतर;

Hinjewadi IT Park Facing Neglect: एकेकाळी जागतिक नकाशावर ‘आयटी हब’ म्हणून नावाजलेली हिंजवडी येथील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरी आज अनेक समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे उद्योगांच्या स्थलांतराची वेळ आली असून, यामुळे हिंजवडीची ‘आयटी नगरी’ एका ‘व्हायरस’ने हायजॅक केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाहतूक कोंडी, दळणवळणाचा अभाव, अरुंद व अतिक्रमित रस्ते, पाणीटंचाई, तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे नागरिक, कर्मचारी आणि अभियंते अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

१९९९ मध्ये स्थापन झालेल्या या आयटी पार्कमध्ये विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प सुरू केले. सध्या येथे साडेचार लाखांहून अधिक संगणक अभियंते आणि कामगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नियोजित असलेले पाच पर्यायी रस्ते आजही केवळ कागदावरच आहेत.

सकाळ-सायंकाळच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी हिंजवडीकरांसाठी नित्याचीच झाली आहे. वाकड ते हिंजवडी आणि भूमकर चौक ते हिंजवडी रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले आहे.

अतिक्रमित नैसर्गिक नाले, सांडपाण्याची समस्या, गाव परिसरात कचऱ्याचे ढिगारे, वीज, पाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने २० मुद्द्यांवर प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला असला, तरी अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.

विशेष म्हणजे, आयटी पार्कच्या उभारणीत नेते शरद पवार, नाना नवले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे मोलाचे योगदान असूनही, १५ वर्षांहून अधिक काळ या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

सध्याच्या महायुती सरकारच्या काळात दोन बैठका झाल्या असल्या, तरी केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याच दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत तब्बल ३७ कंपन्यांनी बंगळूरु आणि इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे. आता तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ श्रेयवादाऐवजी हिंजवडीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा हिंजवडीकरांकडून व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे