हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसर आता ‘अॅक्सिडेंट झोन’ बनला असून, मागील ११ महिन्यांत (१ जानेवारी ते २० नोव्हेंबर) हिंजवडी आणि वाकड परिसरात झालेल्या अपघातांमध्ये ३६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहनांची वाढती वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे, ज्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
या भीषण परिस्थितीला जड-अवजड वाहनांची प्रवेशबंदीच्या वेळेत होणारी घुसखोरी अधिक कारणीभूत आहे. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत बंदी असतानाही चालक सर्रास नियम मोडत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलली असून, ५९ हजार १९६ जड वाहनांच्या चालकांवर गुन्हे दाखल करून तब्बल सहा कोटी ६७ लाख ६० हजार ५०० रुपयांचा प्रचंड दंड वसूल केला आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातामागील मुख्य कारणांमध्ये परिसरात वाहनतळाची व्यवस्था नसणे, रस्त्यांवरील खड्डे, तसेच आयटी अभियंत्यांसाठी बांधल्या जात असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी कच्चा माल पुरवणाऱ्या रेडीमिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पांची वाढती संख्या यांचा समावेश आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ३ ते ४ लाख नागरिक ये-जा करतात.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवून मेट्रोचे काम झाल्यावर राडारोडा हटवण्याची गरज व्यक्त केली आहे. तर वाकड वाहतूक विभागाने प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आरएमसी प्रकल्प चालक आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईसह नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलली आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे















































