PMRDA Encroachment Action Hinjewadi: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हिंजवडी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या १५ दिवसांत PMRDA ने या भागातील १६६ अतिक्रमणांवर धडक कारवाई करत ती निष्कासित केली आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढली होती, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत होता. याशिवाय काही ठिकाणी ओढे-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळेही समस्या निर्माण झाल्या होत्या.PMRDA ने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत, लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल, माण रोड यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत १४ अनधिकृत बांधकामे विप्रो सर्कल येथे, लक्ष्मी चौक ते मेझा नाईन दरम्यान ३८ आणि माण रोड परिसरात ६६ अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. तसेच, माण गावातील नाल्यावरील २८ खोल्या आणि हिंजवडी परिसरातील १९ होर्डिंग्जही काढण्यात आली.
PMRDA चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार आशा होळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. अनेक अतिक्रमणधारकांनी नोटीस मिळाल्यानंतर स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य केले आहे. PMRDA ने स्पष्ट केले आहे की, हिंजवडी परिसरातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार असून, शिवाजी चौक ते स्मशानभूमी रोड, शिवाजी चौक ते वाकड रोड, शिवाजी चौक ते फेज १ रोड यांसह इतर अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे.
या धडक कारवाईमुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल आणि भविष्यात अतिक्रमणे वाढू नयेत यासाठीही प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेतली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे














































