हिंजवडीत मतदारांचा ‘महापूर’ राज्यात सर्वाधिक नोंदणी, तरुणाईचा जलवा!

पिंपरी २८ नोव्हेंबर २०२५ : पुणे जिल्हा परिषदेच्या हिंजवडी (सर्कल क्र. ३५) गटामध्ये मतदारांची विक्रमी नोंद झाली असून, ही संख्या राज्यातील सर्वाधिक ठरली आहे. अंतिम मतदार यादीनुसार या गटात तब्बल ७५ हजार ६५० मतदारांची नोंद आहे, जी राज्यातील सर्वात लहान आठ जिल्हा परिषद गटांच्या एकत्रित मतदारसंख्येपेक्षाही मोठी आहे. ही लक्षणीय वाढ हिंजवडी परिसराच्या वाढत्या लोकसंख्येचे आणि निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांच्या उत्साहाचे प्रतीक आहे.

विशेष म्हणजे, हिंजवडीत युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ‘जेन झी’ (Gen Z) वर्गातील १६ हजार १४१ मतदारांनी नोंदणी केली आहे, तर ७४४ नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाने राबवलेल्या विशेष जनजागृती उपक्रमांमुळे तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने नोंदणीत सहभाग घेतला.

या गटात पुरुष मतदार ४३,९६४ तर महिला मतदार ३१,६८२ असून, चार तृतीयपंथी मतदारांचीही नोंद झाली आहे. मात्र, मतदार यादीत ५,९३६ दुबार नावे आणि सुमारे ६,५०० मतदारांच्या नावासमोर घर क्रमांक ‘उपलब्ध नाही’ अशा काही विसंगतीही दिसून आल्या आहेत.

एकीकडे आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण अभियंते आणि दुसरीकडे पारंपरिक व्यवसायातील मूळ नागरिक, अशा दोन भिन्न अपेक्षा गट असलेल्या हिंजवडीत उमेदवारांची खरी कसोटी लागणार आहे. विक्रमी मतदारसंख्येमुळे हिंजवडी गट जिल्हा परिषद निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे