पुणे भोर, ८ ऑक्टोबर २०२२ : भोर-वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आसलेल्या स्थळांवर जाण्यासाठी मार्गदर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग ४ वर लावण्याची मागणी स्वराजभुमी प्रतिष्ठानने केली होती. त्याला यश आले असुन पर्यटन विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लवकर महामार्गावर फलक लावणार असल्याचे स्वराजभुमी प्रतिष्ठानचे महेद्र देवघरे यांनी सांगितले.
भोर वेल्हा तालुक्यात मार्गदर्शक फलक बसविणे बाबत खासदार सुप्रिया सुळे यांना स्वराजभुमी प्रतिष्ठानने निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खासदार सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणी पर्यटन विकास महामंडळ यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प आधिकारी संजय कदम यांनी प्रतिष्ठानच्या सदस्यांना कार्यालयात बोलावुन माहिती घेऊन लवकरच फलक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, भोर आणि वेल्हे तालुका हा नैसर्गिक वारसा लाभलेला असून या ठिकाणी वर्षभर पर्यटक भेटी देत असतात. राष्ट्रीय महामार्ग चार वरून ऐतिहासिक रायरेश्वर, रोहिडेश्वर,केंजळगड, राजगड, महाराणी सईबाई समाधी स्थळ, तोरणा, पुरंदर, शिवथर घळ, शिवतिर्थ, रायगड, मोहनगड ( जननी मंदिर), कावळा गड, घेवडेश्वर इ. गडकिल्ले तसेच सरदार कान्होजी जेधे, अंगरक्षक जिवाजी महाले, सरसेनापती, येसाजी कंक, वीर धाराऊमाता स्मारक, सरनोबत संभाजी कावजी कोंढाळकर, वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, सरदार ढोरधुमाळवाडा, कृष्णाजीराजे बांदल व बांदल सेना इ. मावळ्यांच्या समाध्या वीरघळी, सतीशिळा, वाडे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेला भोर संस्थांचा राजवाडा त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध बनेश्वर मंदिर, मेंगाई मातामंदिर, क्षेत्र नारायणपूर, बालाजी मंदिर, जगप्रसिद्ध दादा कोंडके यांची जन्मभूमी, नेकलेस पॉइंट, ‘भोरेश्वर मंदिर, श्री मांढरदेवी मंदिर, श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर, आंबवडे झुलता पूल संस्थानकालीन राजवाडा, पंचगंगा, ब्रिटीशकालीन सरसेनापती येसाजी कंक जलाशय (भाटघर धरण), देवघर धरण, गुंजवणी धरण, कोंकण आणि देश यांना जोडणारे ऐतिहासिक मढेघाट आणि वरंधा घाट, आंबाडखिंड घाट या व अशा निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या आणि महाराजांच्या व मराठ्यांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेकविध वास्तू या तालुक्यांमध्ये आहेत. पर्यटन वाढीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ व सदर सर्व ठिकाणी या स्थळांविषयी मार्गदर्शक फलक बसविण्यात यावेत या संदर्भात प्रदीप मरळ, महेंद्र देवघरे, स्वराज्यभूमी प्रतिष्ठानने निवेदन दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड