जेजुरीत ऐतिहासिक पेशवे आणि होळकर तलावाची करणार दुरुस्ती – संजय जगताप

पुरंदर, ११ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे असलेल्या ऐतिहासिक होळकर तलाव आणि पेशवे तलावाचे पुनरुज्जीवन करून या तलावाचे पाणी जेजुरीकरांना कसे उपयोगी येईल, याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे व या ऐतिहासिक तलावाचे माध्यमातून जेजुरीतील पर्यटनाला आणखी चालना कशी देता येईल? याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे .

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी एक तलाव बांधला आहे, त्याचबरोबर पेशव्यांनी सुद्धा एक तलाव बांधला आहे. या दोन्ही तलावात आता मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. त्याचबरोबर या तलावातील काही ठिकाणचे बांध तुटलेले आहेत. मध्यंतरी काही सामाजिक संस्थांनी या तलावातील गाळ काढण्याच प्रयत्न केला. जेजुरीतील तरुणांनी नाला काढून या तलावात पाणी सोडले. तरुणांनी हा चांगला प्रयत्न केला आता शासनाच्या लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे दोन्ही तलाव दुरुस्त करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या तलावातील गाळ काढण्याबाबतचे सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात येईल असे जगताप म्हणाले.

जेजुरी येथे असलेला पेशवे तलाव ३६ एकर क्षेत्रामध्ये आहे. त्यामध्ये ९० ते १०० एमटीएफसी पाणीसाठा होवू शकतो. या ठिकाणाहून जेजुरी शहर आणि एमआयडीसीसाठीच्या वीर धरणातून आलेल्या पाईपलाईन जातात. त्यामुळे याठिकाणी तलावाचा स्टोरेज टँक सारखा देखील उपयोग करता येईल. त्याचबरोबर नगर परिषदेच्याच माध्यमातून इथे बोटिंग सारखे उपक्रम राबवून पर्यटनालाही चालना देता येईल. त्याच पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर तलावाचे देखील पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या तलावातले असलेले अतिक्रमण काढून टाकून त्या ठिकाणी पडलेले बांध पुन्हा बांधण्यात येणार आहेत. ही दोन्ही कामे लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतील.

यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तलावांना भेट दिली असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत याला मंजुरी देण्यात येईल व लवकरच काम सुरू होईल असे संजय जगताप म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा