‘हिटमॅन’ रोहित शर्माचं दिल्लीविरुद्ध नाबाद अर्धशतक, सलग एका पाठोपाठ दुसरं विजेतेपद

शारजा, ११ नोव्हेंबर २०२० : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं सलग दुसऱ्या हंगामात आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात करत मुंबई इंडियन्सनं आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितनं ५१ चेंडूत ५ फोर आणि ४ सिक्ससह ६८ धावांची विजयी खेळी केली. मुंबईनं विजेतेपद पटकावण्याची ही ५ वी वेळ ठरली. मुंबईकर रोहितनं या ५ ही वेळा आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून दिलंय.

साखळी फेरीत रोहित दुखापतीमुळं काही सामने खेळू शकला नव्हता. यामुळं त्याला भारतीय संघात आपलं स्थानही गमवावं लागलं. परंतू यावरही यशस्वीरित्या मात करत रोहितनं अर्धशतकी खेळी करत आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केलाय.

रोहित हा आयपीएलमधील एकमेव यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहित आतापर्यंत एकूण ६ वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. रोहित १ वेळा खेळाडू तर ५ वेळा कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात खेळला आहे. या सहाही वेळा तो यशस्वी झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा