गोल पोस्ट महाराष्ट्र जेएनयू हिंसाचाराचे पडसाद मुंबई, पुण्यात, मध्यरात्री तीव्र निदर्शने

जेएनयू हिंसाचाराचे पडसाद मुंबई, पुण्यात, मध्यरात्री तीव्र निदर्शने

मुंबई: दिल्लीतील जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात रविवारी (५ जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घूसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. ‘अभाविप’कडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने केली. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले.

या प्रकारावर बोलताना आदित्य ठाकरे बोलले की, “निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे” अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत आज सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘जॉइंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस’च्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version