हॉकीपटू वैष्णवी फाळकेची फलटण तालुक्यातील आसू गावात जंगी मिरवणूक व नागरी सत्कार

फलटण, सातारा २१ जून २०२३: आशियाई ज्यूनीअर हॉकी स्पर्धेतील विजेती खेळाडू वैष्णवी विठ्ठल फाळके हिने केलेली दमदार खेळी व तिची वरिष्ठ भारतीय हॉकी संघात निवड झाल्याबद्दल, फलटण तालुक्यातील आसू गावाच्या वतीने तीच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. महिला ज्यूनीअर हॉकीतील दमदार कामगिरीने वैष्णवी फाळके हीची गावात जंगी मिरवणूक व नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, तिची उघड्या जिपमधून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व युवा वर्ग सामील झाला होता. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी वैष्णवी फाळकेचा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. फलटण तालुक्यातील आसू गावची कन्या वैष्णवी विठ्ठल फाळके हिच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने, महाराष्ट्राचे खो-खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे महेंद्र बेडके, उद्योजक राजनभाऊ फराटे, जिल्हा परिषद चे माजी सदस्य विश्वास गावडे, मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद अण्णा झांबरे, मजूर फेडरेशनचे संचालक डॉक्टर हनुमंतराव फाळके,आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे, ढवळेवाडी गावचे उपसरपंच निखिल पवार यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण तालुक्यातील तीन कन्यांचा समावेश हा भारतीय हॉकीमध्ये झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. वैष्णवी विठ्ठल फाळके व ऋतुजा पिसाळ यांनी आशियाई विश्वकप हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय ज्युनिअर संघात खेळताना केलेली उत्कृष्ट खेळी ही संघासाठी विजयापर्यंत पोहोचवणारी होती, आज भारताच्या हॉकी संघामध्ये फलटणच्या तीन कन्यांचा समावेश असल्याने ही फलटणकारांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सत्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- आनंद पवार.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा