रंगांचा सण म्हणून होळी सणाला विशेष असे महत्व आहे. मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना होळी सणाची उत्सुकता लागलेली असते. होळी-धुलिवंदन हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असतो.
होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. तसेच या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असेही संबोधले जाते. धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची विभागणी करण्यात आली आहे.
फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
भारतासह महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून लाकडे पूजा करून जाळण्यात येतात. शिवाय या पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारण्याची पद्धत असल्याने बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे, अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात.
एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
या दिवशी लोक भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.