कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अँटिजेन टेस्ट वाढवण्याचे  गृह राज्यमंत्र्याचे आदेश

ठाणे, दि.३१ जुलै २०२०: शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या  प्रमाणात अँटिजेन टेस्ट करण्यावर अधिक भर देण्यासोबतच कंटेन्मेंट झोनच्या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करण्याकडे लक्ष देण्याचे आदेश गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. याशिवाय शहरातील विविध कोविड रुग्णालयात रुग्णांसाठी बेड्स उपलब्धतेबाबत नागरिकांना माहित मिळण्यासाठी तत्काळ लाईव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. नवी मुंबईतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री शुक्रवारी नवी मुंबईत आले होते.
      
यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन महापालिका कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी करीत असलेल्या कामाचा आढावा घेतानाच रुग्णांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिका करित असलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली. महापालिकेने तयार केलेल्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये सद्यस्थितीत ४०० ऑक्सीजन बेड कार्यान्वित झाल्याचे स्पष्ट करत त्याठिकाणी आणखी ५०० ऑक्सीजन बेड वाढविण्याची सूचना आयुक्तांना केली. तसेच एपीएमसी बाजार समितीच्या आवारात विलगिकरण कक्ष उभारण्याच्या सुचना दिल्या असल्याचे गृह राज्यमंत्री यांनी  सांगितले.

कोरोना टेस्टिंगसाठी येत्या दोन दिवसात महापालिका स्वत:ची स्वतंत्र आरटीसीपीआर लॅब सुरू करणार असल्याचे सांगत शहरातील कमी ऑक्सिजन बेड असलेल्या लहान रुग्णालयाशी संपर्क साधून त्याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून एक व्हेंटिलेटर देऊन महापालिकेने पाठवलेल्या रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार करावेत अशा सूचना देखील गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. तसेच, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन घेत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने तत्काळ करावी व नागरीकांनी देखील बाहेर वावरताना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा