नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर २०२०: दहशतवादाविरोधात मोठं पाऊल उचलत केंद्रीय गृह मंत्रालयानं मंगळवारी नवीन यादी जाहीर केली. यूएपीए कायद्यांतर्गत गृहमंत्रालयानं १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे, या यादीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक साथीदारांचा समावेश आहे. १९९३ च्या मुंबई ब्लास्टमध्ये हात असलेला छोटा शकील, टायगर मेमन यांचादेखील या यादीत समावेश आहे.
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी यूएपीए कायद्यात बदल केले होते, त्याअंतर्गत आता भारतात कोणत्याही व्यक्तीला आतंकवादी म्हणून घोषित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. यापूर्वी केवळ संघटनांना आतंकवादी म्हणून घोषित केलं जात होतं. याचा अर्थ असा की, आतंकवाद्यांच्या समूहांना त्यांच्या गतिविधींवरून आतंकवादी घोषित केलं जात होतं. यामध्ये कोणत्या एका स्वतंत्र व्यक्तीला आतंकवादी घोषित करण्याची सुविधा नव्हती. मात्र, आता या नवीन कायद्यानं एका विशिष्ट व्यक्तींना देखील आतंकवादी म्हणून घोषित करण्यात येऊ शकतं.
घोषित केलेली यादी
१. साजिद मीर (एलईटी)
२. युसुफ भट्ट (एलईटी)
३. अब्दुर रहमान मक्की (एलईटी)
४. शहीद मेहमूद (एलईटी)
५. फरहतुल्लाह घोरी
६. अब्दुल रऊफ असगर
७. इब्राहिम अथर
८. युसूफ अझर
९. शहीद लतीफ
१०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन)
११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन)
१२. जफर हुसेन भट्ट
१३. रियाझ इस्माईल
१४. मोहम्मद इक्बाल
१५. छोटा शकील
१६. मोहम्मद अनीस
१७. टाइगर मेमन
१८. जावेद चिकना
गृह मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, दहशतवादाविरोधात भारताच्या लढा देण्याच्या निर्णयाचा गृहमंत्री अमित शहा यांनी पुनरुच्चार केला. या कायद्यांतर्गत प्रथम सप्टेंबर २०१९ मध्ये भारतानं चार दहशतवाद्यांची आणि त्यानंतर जुलै २०२० मध्ये नऊ दहशतवाद्यांची नावं दिली. आता त्यात आणखी काही नावं जोडली गेली आहेत.
मागील यादीतील यूएपीए अंतर्गत भारतानं मौलाना मसूद अझर, दाऊद इब्राहिम, झाकीर-उर-रहमान लखवी आणि हाफिज सईद यांना दहशतवादी घोषित केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे