पोलिसांनी दहशतवादी निधीसाठी अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा केला उपस्थित
जम्मू-काश्मीर, ७ डिसेंबर २०२२ : दहशतवादी संघटनेने ५६ काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा बैठकीला गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. गृहमंत्रालय नियमित मासिक बैठक म्हणत असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने जाहीर केलेल्या ५६ काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. द रेझिस्टन्स फ्रंट ही लष्कर-ए-तय्यबाची आघाडीची संघटना आहे.
जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की दहशतवादी कारवाया कमीत कमी आहेत आणि अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन दहशतवाद्यांची भरती पूर्णपणे थांबली आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी संघटना मथळ्यात येण्यासाठी अशी यादी जारी करतात. दरम्यान, दहशतवादी संघटनेनेही अशाच प्रकारे पत्रकारांची यादी जारी केली आहे; मात्र केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत खोऱ्यातील विदेशी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसोबतच शस्त्रास्त्र आणि निधी पुरवठ्याबाबतही चर्चा झाली.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की खोऱ्यातील नियंत्रण रेषा ओलांडून होणारी घुसखोरी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे. जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून काही दहशतवादी नक्कीच घुसखोरी करीत आहेत. यासोबतच काही दहशतवादी नेपाळमार्गे येण्याचीही पुष्टी झाली आहे; मात्र सर्वांत मोठी समस्या दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या निधीची आहे. हवालाद्वारे मिळणारा निधी बंद झाला आहे; पण पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना पैसे पाठविले जात असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यासाठी पंजाबमधील सीमेवर सतर्कता वाढविण्याची आणि ड्रोनद्वारे होणारा अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्याची गरज होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड