पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने कोवीड योद्ध्यांचा सन्मान

पुरंदर, दि. १० जून २०२०: गेल्या तीन महिन्यापासून पुरंदरचे प्रशासन व सामाजिक संस्था पुरंदर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यांच्या कामामुळेच पुरंदर मध्ये कोरोनाचा अत्यल्प प्रवेश झाला आणि त्यामुळे त्यांच्या या कामाची दखल घेत पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रशासन व सामाजिक संस्था यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, तालुका संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, निलेश जगताप भरत निगडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुरंदरचे प्रशासन गेल्या ९० दिवसांपासून पुरंदर मध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रयत्न करते आहे. पुरंदर तालुक्याच्या चारही बाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत असताना पुरंदर तालुक्यात मात्र रुग्णांची संख्या एकही नव्हती. त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश आले होते. मात्र गेल्या काही दिवसात मुंबईहून आलेले पुरंदरकर तर पुण्यातील सिरम कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची बाधा झाली. मात्र तरीदेखील न डगमगत या रोगाचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून पुरंदरच्या प्रशासनाने मोठी काळजी घेतली.

प्रांत अधिकारी अनिल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभाग, सर्वच आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र ,त्यांचे कर्मचारी, तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आशा स्वयसेविका, अंगणवाडी सेविका, सासवड, जेजुरी नगरपरिषद, तलाठी, पोलीस कर्मचारी व विविध गावचे पोलीस पाटील यांनी आपापल्या ठिकाणी योग्य ती जबाबदारी सांभाळत कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून मोठी कामगिरी केली. त्यामुळे पुरंदर तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला नाही, त्याचबरोबर ग्रामीण संस्था व मार्तंड देवसंस्थान, जेजुरीतील अनेक तरुण मंडळे, येवले फाउंडेशन, त्याचबरोबर निरा येथील सामाजिक कार्यकर्ते, असे विविध लोकांनी संकटाच्या काळात पुढे होऊन लोकांना मदत केली.

या लोकांचा उचित सन्मान करणे व त्यांचे मनोधैर्य वाढवणे आवश्यक असल्याची भूमिका घेत पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने या सर्वांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. आज पर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर इथून पुढे कराव्या लागणा-या कामाबाबत त्यांच्यामध्ये स्फूर्ती यावी मनोधैर्य वाढावे म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

पुरंदर तालुका पत्रकार संघाची कौतुकाची थाप पाठीवर बसल्यावर कामाला आणखी उत्साह वाढतो असे म्हणतात यापुढे आम्ही आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुका पत्रकार संघाच्यावतीने बाळासाहेब काळे, तानाजी झगडे, भरत निगडे, किशोर कुदळे, प्रदीप जगताप बाळासाहेब पवार, रामदास राऊत, गिरीश झगडे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कोविड योद्ध्यांचा सन्मान केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा