बारामती, १९ ऑक्टोबर २०२०: बारामती नगर पालिकेच्या २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अविरतपणे केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी इन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतिने सन्मानचिन्ह देऊन नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते “कोरोना योद्धा” सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक व इन्व्हायरमेंटल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना संक्रमणाच्या बिकट काळात सगळे गाव लॉकडाऊन असताना बारामती नगर पालिकेचे कर्मचारी मात्र कामावर हजर होते. या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी अहोरात्र व प्रामाणिकपणे काम केले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात माणसातील माणुसकी हरवली असताना बारामती शहरातील अनोळखी १०० पेक्षा जास्त कोविड व्यक्तिंवर या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना काळात रात्रंदिवस कोणतीही तमा न बाळगता शहरातील कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून औषध फवारणी करणे, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेणे, त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगणे या सगळ्या प्रक्रियेत त्यांचा कोरोना बाधित रुग्णांचा संपर्क येत होता.
या सगळ्यांनी आपली जबाबदारी चोख बजावल्याने एकही दिवस सुट्टी घेतली नाही. कामाची पावती म्हणून एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने बारामती नगर परिषदेच्या २० कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये राजेंद्र सोनवणे, विजय शितोळे, सुभाष नारखेडे, अजय लालबीगे, मजीद पठाण, संतोष तोडकर, महेश आगवणे, चंदन लालबीगे, अक्षय बीवाल, युवराज खराडे, साजन खोमणे, नितीन शिंदे, संतोष पवार, चेतन चव्हाण, निखिल शिलवंत, अजय खरात, विनोद क्षीरसागर, सलीम शेख, माऊली बल्लाळ, राजेश लोहाट, रणजित अहिवळे यांचा कोरोना योद्धा म्ह्णून सन्मान करण्यात आला.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव