पुणे दिनांक २९ सप्टेंबर २०२२ : पुणे सोलापूर रोडवर रवी दर्शन येथे स्कुटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंटच्या मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटून मिक्सर शेजारच्या रिक्षावर पलटी झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर बाजूचे तीन जण जखमी झाले आहेत. रणजीत माणिक जाधव असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
पुणे सोलापूर रोडवर हडपसर – रवी दर्शन येथे लक्झरी आणि एसटी बस थांब आहे. येथे आज सकाळी पहाटे ५:३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल केले आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रविदर्शन येथे लक्झरी आणि एसटी बसचा बस थांबतात. येथे बाहेरगावहुन येणारे जाणारे प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी कायमच अपघातजन्य परिस्थिती असून पोलीस यंत्रणेचाही या गोष्टींवर अंकुश राहिलेला नाही. यामुळे पादचार्यांनाही रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. वाहन चालकांनाही आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. या ठिकाणी होणारे अपघात सत्र थांबवण्यासाठी एसटी आणि लक्झरी चा थांबा दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी नागरिकां कडून करण्यात येत आहे.
अपघातानंतर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, विजय देशमुख, सुनील बनकर, प्रशांत सुरसे, बच्चूसिंग टाक आदींनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली. यानंतर या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पुणे सोलापूर मार्गावर शेवाळवाडी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगारांनाही याचा त्रास सहन करावा लागला.
घटनेनंतर या प्रकरणी रिक्षा संघटना आणि पथारी संघटनेचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी हडपसर पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या ठिकाणी झाडामुळे मोठा अपघात होता होता वाचला आहे. रस्त्यावर भीषण अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज असल्याचे मतही बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर