बालासोर, ३ जून २०२३ : ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. रेल्वे अपघाताच्या इतिहासातील हा देशातील आजवरचा सर्वात मोठा अपघात आहे. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण पंधरा डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या २८३ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर अपघातात आतापर्यंत ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेले बचाव कार्य अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एकूण तीन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला. हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. त्यानंतर मालगाडी कोरोमांडलला जाऊन धडकली.
हा अपघात झाला तेव्हा या अपघातात ५० ते ७० लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा १२० वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही ३५० वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा २८३ आणि जखमींचा आकडा ९०० झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी या ठिकाणी ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, जखमींची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिकांसोबत काही बसेसही तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या या रुटवरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची पाच पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत.
या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर ओडिशा सरकारकडून आज एक दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर