पुणे, २३ डिसेंबर २०२२ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे पुण्याकडून सोलापूरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीचे टायर अचानक फुटल्याने गाडी दुभाजकावरून विरोधी बाजूच्या लेनवरून येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने अपघातात स्विफ्टमधील बहीण व भाऊ दोघेही ठार झाले आहेत.
हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला असून पुण्याकडून भालकीकडे (जि. बिदर) सुटीसाठी स्विफ्ट (एमएच- ०६, बीयू- ४०८९) गाडी भरधाव वेगात जात असताना मळद हद्दीत अचानक स्विफ्टचे टायर फुटले. त्यामुळे स्विफ्ट दुभाजक ओलांडून विरोधी बाजूच्या सोलापूर लेनवरील कंटेनरला (एमएच- ४३, वाय- ४६६९) जोरात धडकली. कंटेनरच्या धडकेने स्विफ्टच्या पुढील व डाव्या बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेत स्विफ्टमधील शिल्पा तुलशी गिरी ( वय ३० ) या गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्या. तर गाडी चालविणारा त्यांचा भाऊ माधव गौरव गिरी ( वय २४, रा. भालकी जि. बिदर ) यांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. अधिक तपास दौंड पोलिस करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नीलेश कांबळे