पुणे, १४ जानेवारी २०२३ : सिन्नर-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी (ता. १३) झालेल्या अपघाताला २४ तास उलटत नाहीत तोच महाबळेश्वर येथे ३५ मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला आज सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे या टेम्पोमध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिलाही होत्या. या टेम्पोमध्ये बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील मजुरांचा समावेश होता.
बुलडाणा आणि अकोला भागातून मजूर टेम्पोने प्रवास करीत होते. महाबळेश्वरजवळ तापोळा रस्त्यावर असलेल्या मुकदेव गावानजीक आल्यावर तीव्र उतारावर हा टेम्पो अपघातग्रस्त झाला. या टेम्पोमध्ये ३५ मजूर होते. यामध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिलाही होत्या. अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तळदेव आणि महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
महाबळेश्वर येथे रस्त्याच्या कामासाठी हे मजूर आले होते; मात्र त्यांचा टेम्पो अपघातग्रस्त झाला. यावेळी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली; मात्र या अपघातामुळे मजुरांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता, मजुरांची वाहतूक करण्यासाठी बस, कार, किंवा रिक्षा असायला हवी; मात्र टेम्पोमध्ये अशी वाहतूक कशी काय करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील