पुणे, ४ ऑगस्ट २०२०: पुणे महानगरपालिका हद्दीतील हॉटेल्स, लॉज, अतिथीगृह, मॉल बुधवारी ( दि.५) पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
व्यावसायिकांना केवळ ३३ टक्केच क्षमतेसह काही अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेकडून जे हॉटेल क्वारंटाईन केंद्र म्हणून वापर करण्यात येत आहे, त्याचा वापर तसाच पुढे राहील.
याशिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये हे सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असून व्यवसायिकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये, पार्किंगमध्ये आणि आवारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच परिसरात कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये, असेही पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.
याशिवाय हॉटेल अथवा मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग व्यवस्था, सॅनिटायजर स्टँड उपलब्ध करून घ्यावे, मास्क, हातमोजे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.
तसेच ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देताना, बाहेर पडताना ऑनलाइन साधनांचा वापर करावा. तसेच हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच हॉटेल, मॉल मध्ये प्रवेश द्यावा अशा सूचना विक्रम कुमार यांनी दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे