केडगाव,२४ ऑक्टोबर २०२० : पारगाव-नानगाव रस्त्यावरील गणेश रोड येथे पाटबंधारे खात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे गेल्या दहा दिवसापासून येथील जवळपास १० घरे पाण्याखाली आहेत. संतप्त ग्रामस्थांनी यामुळे पारगाव नानगाव रस्ता आडवला असून गोले २० तास या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावरच भाक-या थापल्या. या पाण्यामुळे महेश ज्ञानदेव रासकर ,शरद बबन रासकर,संजय महादेव रासकर,नामदेव किसन रासकर,बाळू आढागळे पार्वती आढागळे,आनंद यादव ,रमेश यादव ,विठ्ठल खळदकर, यांची घरे पाण्याखाली गेली आहेत.
यासंदर्भात सविस्तर हकीकत अशी की, खडकवासला पाटबंधारे विभागाचे २२ फाटा येथील पाणी पारगाव पर्यंत येत होते. नानगाव येथे गेली वीस पंचवीस वषार्पासून सदरचे पाणी येणे बंद होते. नानगाव ग्रामस्थांची २२ फाटा पाणी नानगाव मध्ये यावे अशी मागणी नसतानाही पाटबंधारे खात्याने नानगाव पर्यंत कालवा खोदला. गणेश रोड येथे कालव्याच्या कडेने पाझर चारी नसल्याने जवळपास ५०० हॉर्स पॉवर विद्युतपंपाचे पाणी वाहत आहे. या पाण्याला आउटलेट काढले नाही. गणेश रोड परिसरातील दोन्ही बाजूच्या घराच्या भिंती कोसळल्यामुळे येथील संसार उघड्यावर पडले आहेत संबंधित ग्रामस्थांनी रस्त्यावरच संसार थाटले आहेत.
आज दिवसभरात पाटबंधारे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, शाखा अभियंता शंकर बनकर ,यवतचे बांधकाम शाखा अभियंता महारुद्र खबिले, पंचायत समिती सदस्य सयाजी ताकवणे, राजकुमार मोटे, विश्वास भोसले, आबा खळदकर, चंद्रकांत खळदकर, सचिन शिंदे, प्रल्हाद रासकर,सचिन रणदिवे घटनास्थळी भेट देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात बाधित घरमालक छाया अढागळे म्हणाल्या की, आमची घरे पडली आहेत. आम्ही रस्त्यावर संसार थाटला आहे. घरातील सर्वजण मिळेल त्या जागेवर ते झोपत आहेत त्यामुळे रात्री अपरात्री विंचू काटा चावण्याची भीती वाटत आहे. पोलीस व पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांना आमच्या व्यथा मांडल्या आहेत.
पारगाव पुनर्वसन ग्रामस्थाचे शासनाच्या आदेशाच्या विरोधात उपोषण-पारगाव येथील मोशी बुद्रुक येथील कालवा फोडल्यास परिसरातील ४0 कुटुंब पाण्यामुळे बाधित होतील त्यामुळे या परिसरामध्ये शासनाने पाणी सोडू नये अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ अतुल ताकवणे केली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक भास्कर ताकवणे हे शासनाच्या आदेशाविरोधात उपोषणाला बसले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव