श्रीलंका उध्वस्त होण्याच्या मार्गावर कसा पोहोचला, परिस्थितीला जबाबदार सरकार की आणि कोण?

श्रीलंका आर्थिक संकट, 11 जुलै 2022: भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत जणू संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे, लोकांनी बंड केलंय, हजारो लोकांनी राष्ट्रपती-पंतप्रधानांच्या घरांवर कब्जा केलाय, सर्वात मोठा नेता घटनास्थळावरून गायब आहे आणि तसे असेल तर, देशात अराजकतेची अशी अवस्था आहे की पुढं काय होणार हे ना जनतेला, ना नेत्याला, ना अधिकाऱ्यांना माहीत आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचे आता राजकीय संकटात रूपांतर होत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्याचं मान्य केलं आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा परिस्थितीत आता तेथे सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, सभापती महिंदा यापा अबेवर्देना यांनी सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत नव्या राष्ट्रपतींची नियुक्ती आणि नवीन सरकार स्थापनेवर चर्चा होणार आहे.

अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या श्रीलंकेतील लोक शनिवारी संतप्त झाले. हजारो आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर कब्जा केला. त्याच दिवशी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खाजगी निवासस्थानालाही आग लावण्यात आली होती. कोलंबोतील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी तीन दिवसांपासून हजारो लोक उभे आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे गुप्त ठिकाणी गेले आहेत. तेथून त्यांनी पंतप्रधान विक्रमसिंघे यांना 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे.

राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढं काय?

श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास, पंतप्रधान आपोआप कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान कार्यवाहक अध्यक्ष राहतात.

पण, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा देण्याचे बोलले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघांनीही राजीनामा दिल्यास सभापती 30 दिवसांसाठी कार्यवाहक राष्ट्रपती बनतात, असं घटनेत म्हटलं आहे.

श्रीलंकेच्या सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात सभापती अबेवर्देना आता कार्यवाहक राष्ट्रपती बनतील. मात्र 30 दिवसांच्या आत संसदेला नवा राष्ट्रपती निवडावा लागेल. राष्ट्रपतींचा कार्यकाळ अजून 2 वर्षांचा आहे. म्हणजेच नवे अध्यक्ष या पदावर दोन वर्षे राहतील.

श्रीलंकेतील परिस्थिती किती वाईट?

22 कोटी लोकसंख्या असलेला श्रीलंका 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे. अन्न आणि औषधांसारख्या मूलभूत गरजांचाही तुटवडा आहे. स्वयंपाकासाठी रॉकेल आणि एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी लोक रांगा लावत आहेत.

हजारो आणि लाखो लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर आहेत. देशाला आर्थिक संकटात टाकण्यासाठी लोक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी मे महिन्यात राजीनामा दिला तेव्हा लोकांचा रोष रस्त्यावर आला. आणि आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देखील राजीनामा देणार आहेत.

वृत्तसंस्थेनुसार, श्रीलंकेतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. इंधन देखील केवळ अत्यावश्यक सेवांपुरतं मर्यादित आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुटवड्यामुळं रुग्णांना रुग्णालयात जाता येत नाही. अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडत आहेत.

एवढेच नाही तर गाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. प्रवाशांना डब्याच्या वर बसून प्रवास करावा लागत आहे. राजधानी कोलंबोसह अनेक प्रमुख शहरांमध्ये इंधन खरेदीसाठी शेकडो लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. कधी-कधी लोकांची पोलिस आणि लष्कराशी झटापटही होत आहे.

पण हे सर्व कसं घडलं?

– चीनशी जवळीक वाढली :

2015 मध्ये महिंदा राजपक्षे यांचं सरकार आल्यापासून चीनशी जवळीक वाढली आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली चीनने मोठी कर्जे दिली. श्रीलंकेच्या आर्थिक संकटामागं चीन हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जातं.

– कर्ज वाढलं :

श्रीलंकेवरील विदेशी कर्ज वाढतच गेलं. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेनुसार, देशावर 2010 मध्ये $21.6 अब्ज डॉलरचं बाह्य कर्ज होतं, जे 2016 मध्ये $46.6 अब्ज झालं. सध्या श्रीलंकेवर 51 अब्ज डॉलरहून अधिक कर्ज आहे.

– परकीय चलनाच्या साठ्यात घट:

जास्त कर्ज घेतल्यानं आणि कमी कमाई केल्यामुळं श्रीलंकेच्या परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने घट झाली. एप्रिल 2018 मध्ये, सुमारे $10 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता, जो मे 2022 पर्यंत $1.7 अब्जवर आला आहे.

पर्यटनाला फटका:

श्रीलंकेची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोनामुळं पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. श्रीलंकेच्या GDP मध्ये पर्यटन आणि संबंधित क्षेत्रांचा वाटा सुमारे 10% आहे. परदेशी पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळं परकीय चलनाचा साठाही कमी झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा