मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : पुण्यातील तळेगावमधे येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तळेगावमध्ये आंदोलन केले. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांना या प्रकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारला चांगलंच लक्ष्य केलं होतं. याचदरम्यान, पुणे, बारामतीच्या दौऱ्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आल्या होत्या, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी आंदोलन करुन त्यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, निर्मला सितारमण यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली होती. आता, शिवसेनेच्या मुखपत्रातून अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेनं निर्मला सितारमण यांना अनेक सवाल केले आहेत.
वेदांतासारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एका झटक्यात हिरावला गेला, हा प्रकार दुःखाचा, वेदनेचा आहे. हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये? या वेदनेचा हुंकार मराठी जनतेने देऊ नये? त्याचा जाबही केंद्र सरकारला विचारू नये? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची, हा कुठला प्रकार? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
सीतारमण यांच्याकडे मागितली या प्रश्नांची उत्तरं
वेदांता प्रकल्प नको असे एखादे आंदोलन महाराष्ट्रात झाले का? हा प्रकल्प गुजरातमध्येच व्हावा, अशी मागणी गुजरातमधील जनतेने कुठे आणि कधी केली?
फक्त केंद्र सरकारचीच मंजुरी बाकी असताना प्रकल्प महाराष्ट्रातून गायब कसा झाला?
महाराष्ट्राच्या मनात उसळणारे असे असंख्य रास्त सवाल आहेत. आधी त्यांचे जवाब द्या आणि मग विरोधकांवर आगपाखड करा असं सामनात म्हंटलं आहे. वेदांता हा मोठा प्रकल्प गुजरातला गेला याचा पोटशूळ महाराष्ट्राला कधी होणार नाही. शिवसेना तर गुजरातला नेहमी जुळा भाऊ मानत आली आहे, पण प्रश्न महाराष्ट्राच्या न्याय्य हक्काचाही आहेच, असं स्पष्ट मत यावेळी सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड