नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२०: एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत चांगलंच निशाणावर धरलं आहे. ओवेसी म्हणाले की, गुलाम नबी आझाद जेव्हा जेव्हा हैदराबादला येत असत तेव्हा त्यांनी मला व माझ्या पक्षावर आरोप केले की, तुम्ही भाजपाला पाठिंबा देत आहात. ते म्हणायचे की आम्ही भाजपची ‘बी’ टीम आहोत. आज त्यांच्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना सांगितले आहे की, आपण पक्षाच्या पत्रावर सही केली आणि भाजपला पाठिंबा दर्शविला … गुलाम नबी आझाद यांना आता किती काळ काँग्रेसची गुलामगिरी करता येईल याचा विचार करावा लागेल …
ओवेसी म्हणाले की, गुलाम नबी आझाद गेली ४५ वर्ष काँग्रेस पक्षात आहेत. आज त्यांच्याच पक्षातील त्यांचे नेता त्यांच्यावर आरोप करीत आहेत की ते भाजपला पाठिंबा देत आहेत. स्वत: गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांना सांगितलं की, मी जर भाजपला भेटलो तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. यावरून हे सिद्ध झाले आहे की, जर तुम्ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला विरोध केला तर तुम्हाला भाजपमध्ये आणलं जाईल. आता आपणास त्या मुस्लिम नेत्यांनी विचार करावा लागेल जे काँग्रेस पक्षात आपला वेळ घालवत आहेत. जेव्हा आपल्यावर आरोप ठेवले जातील, आपण किती काळ अशी गुलामगिरी करत रहाल?
भाजपाकडूनही काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या बैठकीत सुरू असलेल्या चर्चेवरून भाजपाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘एएनआय’शी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले,”जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात आला. आता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते पूर्णवेळ पक्षाध्यक्षपदाची मागणी करत आहेत, तर त्यांच्यावरही भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही,” अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी