“आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल?” राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२०: केंद्र सरकारनं शेतीविषयक तीन कृषी कायदे आणले. यावर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी सातत्यानं विरोध करत आहेत. आता हा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सोळा दिवस होऊन गेले आहेत तर आज सतरावा दिवस सुरू आहे. आतापर्यंत सरकार व शेतकरी यांच्यामध्ये सहा वेळा चर्चा झाली आहे मात्र, या सहा ही चर्चा विफल ठरल्या आहेत. दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपली भूमिका आक्रमक ठेवली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्यानं टीका सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ”कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावं लागेल?” असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला विचारला आहे. काँग्रेसनं म्हटलं आहे की, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारच्या हृदयास पाझर फुटलेला नाही.

शेतकऱ्यांकडून हे तीन कृषी कायदे मागं घेण्याबाबत सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडं सरकार हे तीन कृषी कायदे मागं घेण्यास तयार नाही. शेतकऱ्यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं आहे की, कृषी कायदे मागं घेण्याखेरीज आम्ही कोणताही प्रस्ताव मान्य करणार नाही, तर सरकारनं काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या काही मागण्या ऐकत एक सुधारित प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता, जो शेतकऱ्यांनी अमान्य केला. यानंतर शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा देखील केली होती.

आज दिल्ली-जयपूर महामार्ग रोखणार…

या सर्वात शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना दुसरीकडे सरकार हा कायदा मागे घेण्यास नकार देत आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या मते, शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, १२ डिसेंबर रोजी शेतकरी दिल्ली-जयपूर महामार्ग रोखतील. यावेळी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरांसमोर आणि भाजप नेत्यांच्या घरासमोर निषेध करतील, टोल प्लाझा देखील रोखले जातील. यादरम्यान रेल्वेसेवा जाम करण्याचा शेतकऱ्यांचा कोणताही हेतू नाही. मात्र, राजस्थान वरून देखील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रवाना झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा