किती आहे योगी आदित्यनाथ यांची संपत्ती? योगींनी प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

11

यूपी, 5 फेब्रुवारी 2022: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शुक्रवारी त्यांनी गोरखपूर शहरातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जादरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशीलही दिलाय. यामध्ये त्यांनी 1.54 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं सांगितलं आहे. सीएम योगी यांनी आपल्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये एक लाख रुपये रोख आहेत. यापूर्वी 2017 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती 95.98 लाख रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत सुमारे 60 लाख रुपयांची वाढ झालीय.

कोणत्या संपत्तीचे मालक आहेत योगी आदित्यनाथ

सीएम योगी यांची दिल्ली, लखनौ आणि गोरखपूरमधील 6 ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमध्ये 11 खाती आहेत. या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे.

सीएम योगी यांच्याकडं जमीन किंवा घर नाही. परंतु राष्ट्रीय बचत योजना आणि विमा पॉलिसींद्वारे त्यांच्याकडे 37.57 लाख रुपये आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपयांची सोन्याची कुंदन आहे. त्यांचे वजन 20 ग्रॅम आहे. तसेच योगींनी सोन्याच्या साखळीत रुद्राक्षाची माळ घातली, ज्याची किंमत 20 हजार रुपये आहे. या साखळीचं वजन 10 ग्रॅम आहे.

सीएम योगी यांच्याकडे 12 हजार रुपयांचा मोबाईलही आहे. गेल्या वेळी योगींनी सांगितलं होते की, त्यांच्याकडं दोन कार आहेत, पण यावेळी त्यांच्याकडं एकही कार नाही.

योगी सोबत शस्त्रेही ठेवतात. त्यांच्याकडं एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे.

योगी पहिल्यांदाच लढवत आहेत आमदारकीची निवडणूक

योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 5 जून 1972 रोजी जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती.
योगी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे