स्थायी सदस्यत्वासाठी भारताला आणखीन किती काळ वाट बघावी लागेल…?: मोदी

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केलं. पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या अधिवेशनाच्या महासभेला संबोधित करताना कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर चर्चा केली. त्याचबरोबर पीएम मोदी म्हणाले की, संपूर्ण मानवता या संकटातून मुक्त होण्यासाठी भारताची लस उत्पादन व लसी वितरण क्षमता उपयुक्त ठरेल.

कोरोना संकटामुळं यूएन जनरल असेंब्ली’चं आयोजन व्हर्च्युअल पद्धतीनं झालं. यावेळी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रातील स्थायी जागेचा मुद्दाही उपस्थित केला. पीएम मोदी म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर पासून भारताला अजून किती काळ अलग ठेवलं जाईल.

भाषणातील ठळक मुद्दे:

साथीच्या रोगानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आपण स्वावलंबी भारताच्या दृष्टीनं पुढं जात आहोत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, सर्व योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविला जाईल याची काळजी भारतात घेतली जात आहे.

पाईप्समधून पिण्याच्या पाण्याचं वितरण आपल्या गावातल्या दीड दशलक्ष घरात पोचवण्यासाठी भारत एक मोहीम राबवित आहे. काही दिवसांपूर्वी भारतानं आपल्या ६ लाख गावे ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबर’शी जोडण्यासाठी एक मोठी योजना सुरू केली आहे.

आज जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून मला जागतिक समुदायाला आणखी एक आश्वासन द्यायचं आहे. भारताची लस उत्पादन आणि लसी वितरण क्षमता या संकटातून संपूर्ण मानवता बाहेर आणण्यासाठी कार्य करेल.

पीएम मोदी म्हणाले की, भारतानं संपूर्ण मानवजातीच्या हिताबद्दल नेहमीच विचार केलाय. भारताची धोरणं या तत्त्वज्ञानानं नेहमीच प्रेरित असतात, तर त्याच्या स्वार्थासाठी नव्हे. साथीच्या आजाराच्या या कठीण परिस्थितीत भारताच्या फार्मा उद्योगानं दीडशेहून अधिक देशांमध्ये आवश्यक औषधं पाठवली आहेत.

पीएम मोदी म्हणाले, ‘जेव्हा भारत एखाद्याशी मैत्रीचा हात वाढवितो, तेव्हा तो कोणत्याही तिसर्‍या देशाच्या विरोधात नसतो. जेव्हा भारत विकासाची भागीदारी बळकट करतो, तेव्हा त्या मागं कोणत्याही भागीदार देशाला भाग पाडण्याचा विचार केला जात नाही. आपल्या विकासाच्या प्रवासातील अनुभव सामायिक करण्यात आम्ही कधीही मागं नाही.

पीएम मोदी म्हणाले की, यूएन सुधारणांची प्रक्रिया पूर्ण होण्याची भारतीय जनता बरीच प्रतीक्षा करत आहे. ही प्रक्रिया तार्किक टप्प्यात कधी पोचणार का? याविषयी भारतीय जनतेमध्ये चिंता व्यक्त केली जातेय. संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला आणखीन किती काळ वाट बघावी लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा