पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची काळजी कशी घ्याल

पावसाळ्यामध्ये पोल्ट्री शेडच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करून घ्यावी.शेडच्या बाजूंनी वाढलेले गवत काढून घ्यावे.

पोल्ट्री शेडच्या आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने चर खोदावेत. जेणेकरून तिथे पाणी साचून राहणार नाही.

शेडचे छप्पर भिंतीपासून पुढे आलेले असावे. जेणेकरून पाऊस शेडच्या आतमध्ये येणार नाही. पोल्ट्री शेडची पत्रे गच्च बांधून घ्यावेत. त्यामुळे जोरदार पावसात किंवा वादळात उडून जाणार नाहीत.

नवीन पिल्ले शेडमध्ये ठेवण्याच्या अगोदर चुना मारून घ्यावा.

शेड मध्ये माश्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

पावसाळ्यामध्ये शक्‍यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. कोंबड्यांना त्रास होत नाही.

शेडचे छप्पर गळके नसावे.

शेडमधील लिटर दिवसातून दोनदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यावे. जेणेकरून त्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही. लिटर ओले राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लिटर ओले राहिल्यास त्यामधून विविध आजार होण्याची शक्यता असते. ओलाव्यामुळे कोंबड्यांमध्ये कॉक्‍सीडीऑसीस आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. लिटर जास्त ओले झाल्यास बदलावे.

कोंबड्यांचे खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. प्रत्येक वेळेस खाद्याची तपासणी करावी,त्यानंतर खाद्य खाण्यास द्यावे. ओलाव्यामुळे खाद्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.

खाद्य आणि पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. पिण्यास स्वच्छ पाणी द्यावे. तसेच पाण्यामध्ये जंतुनाशकाचा वापर करावा. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होण्याची जास्त शक्यता असते. त्यातून विविध आजार होण्याची देखील शक्यता अधिक असते.

शेडच्या बाहेर फूटबाथ चा वापर करावा. रोगप्रसार टाळण्यासाठी बाहेरील व्यक्ती तसेच वाहन यांचा शेडच्या आवारात प्रतिबंध करावा.

मेलेल्या कोंबड्यांना उघड्यावर फेकू नये. त्यांना खड्यामध्ये पुरावे. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टळतो. वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा