लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काल गोपीनाथ गडावर अलोट गर्दी

13

परळी, बीड १३ डिसेंबर २०२३ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची आज गोपीनाथ गडावर अलोट गर्दी उसळली होती. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शहरात व गडावर श्रमदान, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, रक्तदानासह सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत मंदिर परिसरात स्वच्छता केली. बौध्दविहारात वंदना तसेच दर्ग्यावर चादर अर्पण करून प्रार्थना केली.

लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथास अभिषेक करून दर्शन घेतले, त्यानंतर मंदिर परिसरात कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहिम राबवली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील यात सहभागी झाले होते. सध्या थंडीचे दिवस असल्याने त्यांनी याठिकाणी गोरगरिबांना उबदार ब्लॅकेटचे वाटप केले तसेच त्यांना अन्नाचा घासही भरवला. भीमनगर भागातील सुगंध कुटी बौध्दविहारात जाऊन मुंडे भगिनींनी बुध्दवंदना केली. मलिकपुरा भागातील दर्ग्यास चादर चढवून त्यांनी प्रार्थना केली.

पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मुंडे साहेबांना आवडणाऱ्या पदार्थाचे नेवैद्य ताट समाधीला अर्पण केले तसेच भजनी मंडळीसमवेत भजनातही त्या तल्लीन झाल्या. याठिकाणी आयोजित रक्तदान शिबीरात प्रत्यक्ष सहभाग घेऊन रक्तदानही केले. महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुचिता पोखरकर यांच्या वतीने गोरगरिब व गरजू व्यक्तींना मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याच्या मोहिमेचा त्यांनी शुभारंभ केला तसेच काहींना हेल्थ कार्डचे वाटप केले.

लोकनेते मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठी गर्दी उसळली होती. ‘अमर रहे, अमर रहे, मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तसेच अन्नदान व प्रसादाचा मोठया संख्येने लाभ घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुन गित्ते