छत्रपती संभाजीनगर, १० फेब्रुवारी २०२३ : फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.१० मार्च) फुलंब्री तहसील कार्यालयावर सरकारविरोधात शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी विराट शेतकरी व जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गगनाला भिडलेली महागाईमुळे आज सर्वसामान्यांचे हाल होत असून, राज्य व केंद्र सरकार मूग गिळून शांत बसलेले आहे; तसेच शेतकरी बांधवांना शेतमालावर न मिळणारा हमीभाव, अवकाळी पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान यातून सावरण्यासाठी सरकारतर्फे कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाला माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, मा. आ. नामदेव पवारजी, महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे, किरण पाटील डोणगावकर व फुलंब्री विधानसभा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने घोषित केलेले प्रोत्साहनपर अनुदान ५० हजार रुपयांपर्यंत त्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे.
पेट्रोल/डिझेल व रासायनिक खतांचे दर कमी झाले पाहिजेत. देवगिरी सहकारी साखर कारखाना शासनाने त्वरित सुरू करून कर्मचारी / कामगारांचे थकीत पगार तत्काळ देण्यात यावे, घरगुती गॅस सिलिंडरचे दर त्वरित कमी झाले पाहिजे, महिला बचत गटाच्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाने घोषित केलेले अनुदान त्वरित मिळाले पाहीजे, शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज तोडण्यात येऊ नये, दिवसा शेतीसाठी वीज मिळावी,
कापसाला प्रतिक्विंटल १५००० हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे आदी मागण्यांचे निवेदन
शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलंब्रीच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले