ग्रुप ग्रामपंचायत दाखणे हद्दीतील शेकडो महिला – भगिनींनी लुटले आनंदाचे वाण

माणगाव, २४ जानेवारी २०२३ : ग्रुप ग्रामपंचायत दाखणे सरपंच विश्वास दिलीप उभारे यांच्या संकल्‍पनेतून ग्रुप ग्रामपंचायत दाखणे हद्‌दीतील स्‍थानिक व नोकरी व्यवसायानिमित्‍त मुंबई स्‍थित महिलांसाठी आयोजित ‘हळदी कुंकू’ समारंभ व ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम मोठ्या जल्‍लोषात पार पडला. यावेळी ग्रामस्‍थ, महिला व मुंबईकर मंडळ दाखणे यांच्यावतीने दाखणे गांवचे सुपुत्र बाळासाहेबांची शिवसेना – युवासेना द. रायगड जिल्‍हाप्रमुख विपुल उभारे यांचा भव्य सत्‍कार करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, युवासेना जिल्‍हाप्रमुख विपुल उभारे, माजी जि.प.सदस्‍या अपर्णा घोसाळकर, शिवसेना महिला आघाडी जिल्‍हा संघटक निलिमा घोसाळकर आदी मान्यवरांनी उपस्‍थित राहून सरपंच विश्वास उभारे, ग्रामस्‍थ, महिला व मुंबईकर मंडळ दाखणे यांच्या सुरेख आयोजनाबद्‌दल विशेष कौतूक करीत शुभेच्छा दिल्‍या.

महिला भगिंनी स्‍वत:चा आनंद बाजुला ठेवून दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्‍या कुटुंबासाठी राबत असतात, कष्‍ट घेत असतात. त्‍या महिला भगिंनींना सुध्दा एक दिवस स्‍वत:साठी मनमुराद जगता यावे, आनंद लुटता यावा या भावनेतूनच सरपंच विश्वास उभारे यांच्या संकल्‍पनेतून खास महिला भगिंनीसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खेळ पैठणीचा या कार्यक्रमात एकूण २१ पैठण्यांचे बक्षिस ठेवण्यात आले होते, दिवसभर महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन मनमुरादपणे या खेळाचा आनंद लुटला.

हळदी कुंकू म्हणजे सुवासिनींचाच सण मानला जातो. त्यामुळे या सणासाठी विधवा महिलांना दूर ठेवून सुवासिनींनी हा सण साजरा करावा अशी प्रथा आहे. माणगांव तालुक्‍यात आपल्‍या कार्यपध्दतीने ज्‍यांनी नावलौकीक प्राप्त केले आहे असे कार्यसम्राट सरपंच विश्वास उभारे यांनी रुढी आणि परंपरेच्या बंधनात असलेल्या विधवा महिलांना मोकळा श्वास घेता यावा, स्वाभिमान आणि सन्मानाने जगता यावे यासाठी या रुढींना फाटा देत विधवा महिलांना सुध्दा या कार्यक्रमात विशेष आमंत्रित करुन त्‍यांना हळदी कुंकवाचा मान व वाण देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रामपंचायत हद्दीतील मागासवर्गीय व आदिवासी भगिनींना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी करून घेत एक सामाजिक समानतेचा व एकात्मतेचा आदर्श सरपंचांनी सर्वांसमोर निर्माण केला आहे. सरपंच विश्वास उभारे यांनी घेतलेल्‍या समाजाभिमुख निर्णयामुळे सर्वत्र त्‍यांचे कौतूक केले जात आहे. कोरोना काळात विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षिका, अंगणवाडी सेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ दाखणे अध्यक्ष गणपत उभारे, मुंबई मंडळ अध्यक्ष आकाश उभारे, महिला मंडळ अध्यक्षा संगीता पानवकर, माजी सरपंच दिलीप उभारे, शिवसेना महिला संघटिका मुंबई रेखाताई मुंढे, कार्याध्यक्ष वसंत उभारे, ग्रा.पं. सदस्य सिताराम उभारे, सुनिल नाडकर, सौ. संजना करकरे, संस्कृती शिर्के, खर्डी अध्यक्ष राजू शेडगे, पोलीस पाटील निलेश खडतर, विकास मोरे, संतोष सावंत, शाखाप्रमुख संतोष उभारे, उपशाखाप्रमुख दिनेश उभारे आदी ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा